पुढे आलेल्या एका सर्व्हे नुसार कोरोना पासून विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे.कोरोना काळात पर्याय नसल्याने मोबाईल हे अध्ययन व अध्यापनाचे साधन म्हणून उपयोगात आले.परंतु त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये मैदानी खेळ आणि वाचन संस्कृती कमी झाली असल्याचे दिसते आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास व्यतिरिक्त नवीन काहीतरी वाचायला मिळावे म्हणून राज्य शिक्षण विभागाच्यावतीने शाळांमध्ये रोज एक तास वाचनासाठी असा नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. याची शालेय शिक्षण विभागाने तयारी केली असून त्याची सुरूवात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी होणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळांमध्ये आठवड्यातून एक तास वाचण्यासाठी राखून ठेवला जाणार आहे. या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेत वाचन करावे लागणार आहे आणि त्यातून त्याची आकलन आणि वाचन क्षमता विकसीत करण्याचा उद्देश या अभियान असणार आहे. तर पुढे ही वाचन चळवळ दहावी-बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत आणि तिथून पुढे संपूर्ण समाजामध्ये ती रूजली पाहिजे, यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
लोप पावत असलेली वाचन संस्कृतीचे पुर्नजीवन करण्यासाठी मुलांना वाचनाची आवड लागली पाहिजे, म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. एक तास वाचनासाठी असेल या तासात मुले जे वाचन करतील त्याची प्रतिक्रिया मुले आपल्या वहीमध्ये नोंदवतील. केवळ एक तासांच्या वाचनापुरता हा कार्यक्रम नाही तर प्रत्येक शाळांना पुस्तके दिली जातील. ही पुस्तके विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी, त्यांचा विश्वास वाढविणारी विविध वैज्ञानिक, संशोधक, तज्ञांनी कशा पद्धतीने अभ्यास केला, हे सगळे त्यांना वाचनातून कळेल यासाठी हा प्रयत्न असल्याचे मंत्री केसकर यांनी सांगितले.